महाकुंभमेळ्यात भीषण आग: अनेक तंबू जळून खाक

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात अनेक तंबूंना आग लागली. त्‍यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या दुर्घटनेत सुमारे 50 तंबू जळून खाक झाल्‍याचे प्राथमिक वृत्त आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत,स्थानिक अधिकाऱ्यांनी, पोलिस आणि अग्निशमन दलांसह आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, असे वृत्त ANIने दिले आहे.

आज रविवारी दुपारी एका तंबूला आग लागली. काही क्षणात परिसरात अनेक तंबूंना आगीने वेढले. आग विझवण्यासाठी अग्निशमन अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) ची एक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली.

सिलिंडर स्‍फोटामुळे मोठी आग -

महाकुंभमेळ्यासाठी उभारण्‍यात आलेल्‍या एका कापडी तंबूत सिलिंडरचा स्‍फोट झाला. यामुळे आग लागली. काही क्षणात आगीने अनेक तंबूंना आपल्‍या कवेत घेतले, अशी माहिती उत्तर प्रदेशचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रमोद शर्मा यांनी दिली.

आग आटोक्‍यात, सर्व लोक सुरक्षित"

महाकुंभमेळ्यातील सेक्टर १९ मध्ये दोन-तीन सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे आगीचा भडका उडाला. आग आटोक्यात आली आहे. सर्व लोक सुरक्षित आहेत. कोणीही जखमी झालेले नाही. या प्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी माहिती अतिरिक्‍त पोलीस महानिरीक्षण भानू भास्कर यांनी 'पीटीआय'शी बोलताना दिली.