इर्लेवाडीत विठ्ठल-बिरोबा यात्रेनिमित्त भव्य जंगी कुस्त्यांचे आयोजन
.jpeg)
वैराग प्रतिनिधी : बार्शी तालुक्यातील इर्ले - इर्लेवाडी येथे बौद्ध पौर्णिमेनिमित्त ग्रामदैवत
विठ्ठल-बिरोबा यांची भव्य यात्रा पार पडली. या यात्रेनिमित्त भव्य जंगी कुस्ती
स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्वप्नील देवकते आणि दत्तात्रय डुरे उर्फ ‘भैय्या
डुरे’ व त्यांच्या मित्रपरिवाराच्या सहकार्याने गेली तीन वर्षे हा कुस्ती फड
आयोजित केला जात आहे. यात्रेला मुंबई, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातून सर्व
धर्मांचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहात सहभागी झाले. या भव्य
कुस्ती फडामध्ये ‘विठ्ठल-बिरुदेव केसरी’ किताबासाठी प्रमुख कुस्ती अमित जगदाळे व
सुनील जाधव यांच्यात झाली. यामध्ये अमित जगदाळे याने विजय मिळवत रोख ७५ हजार रुपये
व चांदीची गदा मिळवून ‘विठ्ठल-बिरुदेव केसरी’चा मान पटकावला. द्वितीय कुस्तीमध्ये श्रीपाद
ढेकळे (कुर्डूवाडी) यांनी भैय्या धुमाळ (कंदर) यांच्यावर मात करत ५१ हजार रुपयांचे
बक्षीस पटकावले. तृतीय कुस्ती प्रविण वाडेकर व रणजीत सोनवणे यांच्यात झाली.
यामध्ये रणजीत सोनवणे विजयी ठरले व २५ हजार रुपये रोख बक्षीस प्राप्त केले. बक्षीस
वितरण समारंभात वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, गोपनीय विभागाचे किसन कोलते, पत्रकार बलभीम लोखंडे,
आयोजक स्वप्नील देवकते आणि भैय्या डुरे व मित्रपरिवार उपस्थित होते.
या भव्य कुस्ती फडामुळे इर्लेवाडीतील यात्रेला एक नवा उत्साह लाभला असून बिरोबा हे
जागृत देवस्थान असल्यामुळे यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पालखी
मिरवणुकीनंतर कुस्ती फड हा यात्रेचा प्रमुख आकर्षण ठरला.