'ऑक्टेव 25' भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे सोलापुरात आयोजन

सोलापूर - संस्कृती मंत्रालय, भारत सरकार, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'ऑक्टेव 25' या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे सोलापुरात आयोजन करण्यात आले आहे. २६ ते २ मार्च या कालावधीत हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर हा कार्यक्रम सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० या वेळेत पार पडणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन २६ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार असून, माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, तसेच खासदार प्रणिती शिंदे, खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ईशान्येकडील संस्कृतीचे दर्शन या कार्यक्रमात ईशान्य भारतातील ३०० कलाकार विविध सांस्कृतिक कलांचे सादरीकरण करतील. लोकनृत्य, संगीत, पारंपरिक हस्तकला आणि खाद्यसंस्कृती यांचे सोलापूरकरांना अनुभव घेता येणार आहे. हस्तकला प्रदर्शन आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स देखील या कार्यक्रमाचा भाग असतील, जिथे ईशान्येकडील पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. विनामूल्य प्रवेश हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. नागरिकांनी या सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे आणि दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या संचालक आस्था कार्लेकर यांनी केले आहे. सांस्कृतिक सादरीकरणासाठी विशेष तयारी सोलापुरात प्रथमच होणाऱ्या या कार्यक्रमासाठी स्थानीय नाट्यकर्मी आणि कलाकारांचे सहकार्य लाभत आहे. कार्यक्रमाच्या प्रचारासाठी होर्डिंग्ज आणि बॅनर लावण्यात आले असून, हुतात्मा स्मृती मंदिर येथे विशेष सन्मानिका ठेवण्यात आल्या आहेत.