गोरेगाव पश्चिममध्ये भीषण आग; एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबईतील गोरेगाव पश्चिम परिसरात शनिवारी पहाटे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. भगतसिंग नगर येथील एका घराला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असून, या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास या घराला अचानक आग लागली. आग इतकी भीषण होती की घरात झोपलेल्या कुटुंबीयांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

धुरामुळे गुदमरून मृत्यूची शक्यता

आग लागली तेव्हा तिन्ही सदस्य गाढ झोपेत होते. आगीमुळे घरात मोठ्या प्रमाणावर धूर साचला होता. त्यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊन धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाने तिन्ही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

घराला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई पोलीस आणि अग्निशमन दल या प्रकरणाचा सखोल तपास करत असून घटनेची सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे.

मृतांची ओळख

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

  • संजोग नरेश पावसकर
  • हर्षदा संजोग पावसकर
  • कुशल संजोग पावसकर

ही माहिती उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी दिली आहे.