अंतराळातून देशासाठी शुभसंवाद: शुभांशू शुक्लांचा 'तिरंगा' संदेश


भारताच्या शुभांशू शुक्ला यांनी अ‍ॅक्सिओम-४ (Axiom-4) या महत्त्वाकांक्षी मोहिमेसाठी अमेरिकेतील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरवरून यशस्वी उड्डाण केले आहे. हे अभियान स्पेसएक्सच्या फाल्कन ९ रॉकेटद्वारे सुरू झाले असून, शुक्ला आणि इतर तीन अंतराळवीर नवीन स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) प्रवास करत आहेत. अवकाशात पोहोचल्यानंतर शुभांशू शुक्ला यांनी भारतासाठी भावनिक आणि प्रेरणादायी संदेश पाठवला. आपल्या पहिल्या संदेशात ते म्हणाले: "नमस्कार, माझ्या प्रिय देशवासीयांनो! आपण ४१ वर्षांनी पुन्हा अवकाशात पोहोचलो आहोत. हा एक अद्भुत प्रवास आहे. आपण पृथ्वीभोवती ७.५ किलोमीटर प्रति सेकंद वेगाने प्रदक्षिणा घालत आहोत. माझ्या खांद्यावरील माझा तिरंगा मला सांगतो की मी तुमच्या सर्वांसोबत आहे. ही माझ्या अंतराळ प्रवासाची सुरुवात नाही, तर ही भारताच्या मानवी अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात आहे. आपण सर्वजण मिळून भारताचा मानवी अंतराळ कार्यक्रम सुरू करूया. जय हिंद! जय भारत!"


भारताच्या अंतराळ इतिहासात नवे पर्व

1984मध्ये राकेश शर्मा यांच्यानंतर भारताने प्रथमच एका नागरिकाला परदेशी मोहिमेद्वारे अवकाशात पाठवले आहे. शुभांशू शुक्ला यांच्यामुळे भारताचा मानव अवकाश कार्यक्रम नव्या उंचीवर पोहोचला आहे.


कुटुंबात आनंदाचे वातावरण

या यशानंतर शुभांशू शुक्लाच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले, “शुभांशूच्या यशामुळे आमची छाती अभिमानाने भरून आली आहे. आम्ही सर्वजण खूप भावूक आहोत. त्याचं यश संपूर्ण देशाचं आहे.”


संपूर्ण देशाच्या नजरा शुभांशूकडे

अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेचा मुख्य चालक आणि भारताचे प्रतिनिधी म्हणून शुभांशू शुक्ला यांच्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. हे अभियान केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने नाही, तर राष्ट्रीय अभिमानाचाही क्षण ठरला आहे.