सोनं ठेवून कर्ज? आता नव्या नियमांची तयारी!

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सोन्याच्या कर्जाबाबत बँका आणि एनबीएफसी संस्थांच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आज झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीनंतर सांगितले की, रिझर्व्ह बँक लवकरच सोनं कर्जावर नवीन नियमावली आणणार आहे. गेल्या वर्षी 30 सप्टेंबर रोजी देखील आरबीआयने सोनं कर्जाच्या यंत्रणेबाबत चिंता व्यक्त केली होती. यामध्ये सोन्याचे मूल्यांकन, पैशाचा वापर, आणि लिलाव प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आले होते. सध्या बुलेट रिपेमेंट मॉडेलचा वापर केला जातो. यात ग्राहक दरमहा केवळ व्याज भरतात आणि संपूर्ण कर्जाची रक्कम फेडल्यानंतरच त्यांना दागिने परत मिळतात. आरबीआयच्या मते, ही पद्धत बँका आणि ग्राहक दोघांसाठीही जोखमीची ठरते. या पार्श्वभूमीवर, आरबीआय गृहकर्ज आणि वाहनकर्जाप्रमाणे सोनं कर्जावरही ईएमआय प्रणाली लागू करण्याचा विचार करत आहे. यामुळे ग्राहकांना कर्ज फेडणे सोपे होईल आणि बँकांचाही बुडीत कर्जाचा धोका कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.