सोने-चांदी दरांचा नवा उच्चांक; 2026 पर्यंत अडीच लाखांवर जाण्याचा अंदाज

नवी मुंबई/पुणे : डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीच्या दरात झालेल्या वाढीचा थेट परिणाम देशांतर्गत सराफ बाजारावर दिसून आला आहे. शुक्रवारी (दि. 12) सोने आणि चांदीच्या दरांनी नवा उच्चांक गाठला. चांदीचा दर प्रतिकिलो 2 लाख 1 हजार रुपयांवर पोहोचला असून, 24 कॅरेट सोन्याचा दर दहा ग्रॅममागे 1 लाख 37 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. किरकोळ बाजारात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 1 लाख 33 हजार 500 रुपये असून, जीएसटीसह हा दर 1 लाख 37 हजार 500 रुपये झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा जीएसटीसह दर 1 लाख 26 हजार 500 रुपयांवर पोहोचला आहे.

गेल्या एका वर्षात सोन्याच्या दरात तोळ्यामागे तब्बल 32 हजार रुपयांची वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते कुमार जैन यांनी सांगितले की, 2026 च्या डिसेंबरअखेरपर्यंत जीएसटी वगळता सोन्याचा दर प्रती तोळे अडीच लाख रुपये आणि चांदीचा दर प्रतिकिलो अडीच लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सध्या चांदीचा दर 1 लाख 52 हजार रुपये किलो असून, येत्या काळात चांदीचे दरही सोन्याच्या बरोबरीने वेगाने वाढतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. शुक्रवारी मुंबई सराफ बाजारात सोन्याचा दर तोळ्यामागे 1 लाख 35 हजार रुपये होता. जीएसटी आणि घडणावळ धरून एक तोळे सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 1 लाख 38 हजार 50 रुपये मोजावे लागले. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत राहणार असून सराफ बाजारातील तेजी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.