नीट परीक्षेची तयारी करणार्या गेवराईच्या विद्यार्थ्याची लातुरात आत्महत्या

लातूर, दि.३ - नीट परीक्षेची तयारी करणार्या बीड जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने लातूर
शहरातील बोधेनगरात राहत्या खोलीमध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची
धक्कादायक घटना नीट परीक्षेच्या एक दिवस आधी शनिवारी उघडकीस आली आहे. घटनेचे कारण
अद्याप उघडकीस आले नाही. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद
करण्यात आली असून पोलीस तपास करीत आहेत. अनिकेत अंकुश कानगुडे (वय २०) असे मयत
विद्यार्थ्याचे नाव आहे. लातूर ही शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखली जाते. सबंध
महाराष्ट्रासह परराज्यातील लातुरात शिक्षणासाठी तसेच शिकवणीसाठी येणार्या
विद्यार्थ्यांची संख्या ही मोठी आहे. राज्यस्थानमधील कोट्यानंतर लातूरमध्ये सर्वात
जास्त डॉक्टर व इंजिनियर्स होण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल दिवसेंदिवस वाढत चालला
आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने अनेक विद्यार्थी टोकाचे पाऊल
उचलतात. असाच काहीसा प्रकार शनिवारी (दि.३) समोर आला आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी
घेण्यात येणारी नीट परीक्षा रविवारी (दि.४) होणार आहे. मात्र, परीक्षेच्या एक दिवस आधीच अनिकेत अंकुश कानगुडे या वीस वर्षीय
विद्यार्थ्याने राहत्या खोलीमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना
घडली आहे. तो बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई धानोरा येथील रहिवाशी होता.
...............दुसर्या वर्षी करत होता
तयारी............
अनिकेत हा मागच्या दोन वर्षांपासून लातूरच्या
एका नामांकित शिकवणीमधून नीट परीक्षेची तयारी करत होता. दरम्यान, मागच्या वेळी त्याला ५२० च्या जवळपास गुण मिळाले. मात्र,
वैद्यकीय प्रवेश मिळाला नाही. पुन्हा तो नीट परीक्षेची तयारी करत
होता. परंतु, परीक्षेच्या एक दिवस आधीच त्याने आत्महत्या
केली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस
या याचा तपास करत आहेत.