भूगोल हा जीवनाला दिशा देणारा विषय - डॉ. एस. सी.अडवितोट
.jpeg)
सोलापूर, दि. १९ जुलै २०२५
संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर येथील भूगोल अभ्यास मंडळाचे उद्घाटन माजी प्राचार्य डॉ. एस. सी.अडवितोट, सी. बी खेडगी कॉलेज अक्कलकोट यांनी केले. डॉ. अडवितोट यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधताना भूगोल या विषयाचे केवळ नकाशे व भूभागांचे वर्णन करणारे स्वरूपच नव्हे, तर तो समाजाशी, संस्कृतीशी आणि व्यक्तिमत्त्व विकासाशी निगडित विषय आहे, हे प्रभावीपणे उलगडून सांगितले. त्यांनी सांगितले की, "संशोधन हे समाजाभिमुख असावे. केवळ पुस्तकी ज्ञानावर न थांबता, चित्रपट गीते, दृकश्राव्य माध्यमे, तंत्रज्ञान आणि सामाजिक संदर्भ यांच्या सहाय्याने भूगोलाचा सखोल अभ्यास करता येतो." ते पुढे म्हणाले, "जी.आय.एस, रिमोट सेन्सिंग, सॅटेलाईट प्रतिमा या आधुनिक साधनांचा उपयोग करून भूगोल अधिक सखोलपणे समजून घेता येतो. आजचे अवकाश संशोधन प्रगतीच्या टप्यावर असून, त्यातून विद्यार्थ्यांना करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत."या प्रसंगी भूगोल विभागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे त्यांनी अनावरण व कौतुक केले.
प्रास्ताविक करताना भूगोल विभाग प्रमुख डॉ. राजकुमार मोहरकर यांनी भूगोल अभ्यास मंडळाच्या उद्देशाचे व कार्यपद्धतीचे विवेचन केले. या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी यांचीही उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच सामाजिक जाण आणि विज्ञानविषयक दृष्टिकोन बाळगण्याचा संदेश दिला. संगमेश्वर कॉलेजचे प्र.प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांनी अध्यक्षीय समारोप करताना सांगितले की, "भूगोल हा एक व्यापक दृष्टी देणारा विषय असून आजच्या युगात त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. विद्यार्थ्यांनी हा विषय केवळ अभ्यासापुरता मर्यादित न ठेवता, त्यातून नेतृत्व व मूल्याधिष्ठित व्यक्तिमत्त्व विकसित करावे."
सूत्रसंचालन कु. मानसी वाल्मिकी यांनी केले. श्री. सरफराज नदाफ यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला तर आभार प्रदर्शन श्री. रोहित घाडगे यांनी केले. कार्यक्रमाला विभागातील डॉ. शिवाजी मस्के, डॉ. मंजू संगेपाग, प्रा. शिरीष जाधव, डॉ. वैभव इंगळे, डॉ. प्रकाश कादे, डॉ. राहुल साळुंखे, प्रा. रिद्धी बुवा आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे विचार प्रेरणादायी ठरले आणि विद्यार्थ्यांनी त्यातून ज्ञानासोबत दिशा मिळवली.
प्र.प्राचार्य