सोलापूरजवळ साडेसहा कोटींचा गांजा जप्त; १३०९ किलो अमली पदार्थासह एकाला अटक

सोलापूर : सोलापूरजवळ पुणे सीमा शुल्क विभागाच्या नार्कोटिक्स सेलने मोठी कारवाई करत तब्बल साडेसहा कोटी रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. ओडिशातून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकमधून १३०९.०२ किलो गांजा जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुनुपूर, ओडिशा येथून मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पुणे कस्टम्सच्या नार्कोटिक्स सेलला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी गुरुवारी मध्यरात्री पुणे-सोलापूर महामार्गावर विशेष पाळत ठेवली होती.

दरम्यान, संशयित महिंद्रा ट्रक क्रमांक MH 16 DK 5556 सोलापूरजवळ अधिकाऱ्यांनी अडवला. ट्रकमध्ये गांजा रिकाम्या प्लास्टिक क्रेट्सखाली लपवून ठेवण्यात आला होता. त्यामुळे वाहन, चालक आणि पंच साक्षीदारांना पुढील तपासणीसाठी कस्टम्सच्या सीएफआर कार्यालयात आणण्यात आले. एनडीपीएस कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार नार्कोटिक ड्रग फील्ड टेस्टिंग किटच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. या तपासणीत जप्त केलेला पदार्थ गांजा असल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत ६ कोटी ५४ लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गांजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला महिंद्रा ट्रकही जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणातील एका आरोपीला अटक करून त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. हा गांजा नेमका कुठे नेण्यात येत होता, या तस्करीमागे कोणाचा सहभाग आहे आणि या संपूर्ण नेटवर्कमध्ये आणखी कोण कोण सहभागी आहेत, याचा सीमा शुल्क विभागाकडून सखोल तपास सुरू आहे.