गंगोत्री हेलिकॉप्टर क्रॅश – खराब हवामानात भाविकांचा मृत्यू

गंगोत्री, उत्तरकाशी – चारधाम यात्रेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी गंगोत्री परिसरात मोठी दुर्घटना घडली. एक खासगी हेलिकॉप्टर कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन भाविक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे यात्रेवर भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्राथमिक माहितीनुसार, गंगानीपासून पुढे नाग मंदिराजवळील भगीरथी नदीच्या परिसरात ‘एरो ट्रिंक’ या खासगी कंपनीचं सात सीटर हेलिकॉप्टर कोसळलं. या हेलिकॉप्टरमध्ये पायलट कॅप्टन रॉबिन सिंह आणि सहा भाविक प्रवास करत होते. प्रवाशांमध्ये दोन महिला भाविकांचा समावेश होता. हादरलेल्या घटनास्थळी तातडीने पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक, आर्मी, स्थानिक प्रशासन आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

हवामानाचा परिणाम?

उत्तराखंडमध्ये सध्या खराब हवामानाचा फटका बसत असून, वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत पावसासह गारपीट होत आहे. यामुळे अपघातामागे हवामानाचाही संभाव्य संबंध असू शकतो, मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. चारधाम यात्रा ३० एप्रिलपासून सुरू झाली असून, देशभरातून लाखो भाविक या यात्रेसाठी उत्तराखंडमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे हवामान आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.