बीड जिल्ह्यात टोळक्याची दहशत, चौघे तरुण गंभीर जखमी; लघुशंकेवरून अमानुष हल्ला!

बीड:- बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाटेफळ येथे २७ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ७:३० वाजता घडलेली हिंसक घटना जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. लघुशंका केल्याच्या किरकोळ कारणावरून नऊ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांनी दोन तरुणांवर हल्ला केला. या हल्ल्यात एक तरुण बेशुद्ध झाला असून, तिघांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. प्रशांत बापू चौधरी (२२) आणि त्यांचा चुलत भाऊ भाऊसाहेब चौधरी हे दोघे रुईछत्तीशी येथून बाजार करून परत येताना वाटेफळ बस स्टँडवर थांबले असता, त्यांनी लघुशंका केली. यावर नाराज झालेल्या नारायण कोळेकरने दोघांना शिवीगाळ व मारहाण केली. त्यांनी माफी मागूनही मारहाण थांबली नाही. नंतर सोमनाथ चितळकर, सुशील चितळकर, धरम महारनोर, सोन्या उल्हारे, अजय साबळे, दुर्गेश साबळे व इतरांनी लोखंडी रॉड, गज व लाकडी दांडक्यांनी दोघांवर हल्ला चढवला. भाऊसाहेब बेशुद्ध झाले, तर प्रशांतच्या डोक्यावर गंभीर वार झाले. हल्ल्यावेळी आरडाओरड ऐकून प्रशांतचा चुलत भाऊ वेदांत चौधरी आणि मित्र दीपक कराळे घटनास्थळी पोहोचले. टोळक्याने त्यांनाही मारहाण केली. नारायण कोळेकरच्या पत्नीने वेदांतचा मोबाईल फोडला, तर बाळासाहेब कोळेकरने प्रशांतची अंगठी काढून घेतली. प्रशांतने पोलिसांत तक्रार दिली असून, नऊ जणांसह सात-आठ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर जखमींना अहमदनगर सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येची आठवण करून देणारी असून, समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे.