गंभीरा पूल कोसळला, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू; बचावकार्य सुरु

गुजरात : गुजरातमधून बुधवारी सकाळी मोठी दुर्घटना समोर आली आहे. आणंद आणि वडोदरा जिल्ह्यांना जोडणारा ४५ वर्ष जुना गंभीरा पूल अचानक कोसळला. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून, अनेक वाहने नदीच्या पाण्यात कोसळली आहेत. सकाळच्या सुमारास पुलावरून वाहने जात असताना पूल तुटला आणि काही सेकंदांत मोठ्या आवाजात कोसळला. यावेळी एक टँकर कोसळलेल्या पुलावरच अडकला. पाच ते सहा प्रवासी वाहने आणि मालवाहू ट्रक नदीत पडल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते अमित चावडा यांनी या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून दुर्घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हा पूल मध्य गुजरातला सौराष्ट्राशी जोडणारा महत्त्वाचा दुवा होता. दुर्घटनेमुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिस आणि पाणबुडींनी बचावकार्य सुरू केले असून, नदीत पडलेल्या वाहनांतील लोकांचा शोध सुरू आहे. घटनास्थळी आणंद आणि वडोदरा जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, एनडीआरएफचे पथक, अग्निशमन दल आणि स्थानिक पथक दाखल झाले आहेत. सध्या नदीमध्ये दोन ट्रक, एक बोलेरो आणि इतर वाहने स्पष्टपणे दिसत आहेत. या वाहनांमध्ये किती लोक अडकले आहेत, याची नेमकी माहिती अजून मिळालेली नाही. काँग्रेस नेत्यांनी प्रशासनाला तातडीने बचावकार्य आणि वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे गुजरातमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पुलाची झीज व वेळोवेळी न झालेली दुरुस्ती यामुळेच अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.