गड किल्यांच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही शिवनेरी किल्यावर शिवजयंती सोहळा उत्साहात

पुणे: रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे
राज्य सरकार असून या सरकारकडून शिवनेरी किल्ल्यासह इतर गड किल्ल्यांच्या
संवर्धनाला निधी कमी पडू देणार नसल्याची
ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शिवनेरी किल्यावर बुधवारी
आयोजित छत्रपती शिवजी महाराज यांच्या
जयंती सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. शिवाजी महाराजांची 395 वी जयंती आज बुधवारी किल्ले
शिवनेरी येथे पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह
उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार, आमदार शरद
सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवजयंती सोहळ्याचे साक्षीदार
होण्यासाठी राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने शिवभक्त आले होते. शिवनेरी
किल्ले व परिसरात विकासासंदर्भामध्ये आमदार शरद सोनवणे यांनी केलेल्या तेरा ही
मागण्या पूर्ण करण्यासाठी हे सरकार कटीबद्ध आहे. शिवनेरीवर आल्यावर इथली माती
कपाळाला लावल्यावर स्वराज्याची स्फूर्ती मिळते. हीच स्फूर्ती उराशी बाळगून आम्ही
राज्यकारभार करीत असल्याचे
मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,
शिवाजी महाराज हे जगाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी अठरापगड जातीला
सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. या गडकिल्ल्यांमुळे आम्हाला ऊर्जा
मिळते. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या विचारांचे रयतेचे राज्य
करण्याचा आमचा नेहमी प्रयत्न राहतो. यावेळी
बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की शिवाजी महाराजांचे गड किल्ले हे आपले
प्रेरणास्थान आहेत. दरवर्षी शिवजयंती सरकारच्या वतीने शिवनेरी किल्ल्यावर साजरी
होते. शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा सर्वांना प्रेरणादायी ठरत आहे. यावेळी
आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके यांची ही भाषणे
झाली. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवजन्म स्थळी
शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले व महिलांनी पाळणा गीत म्हटले. जिल्हा
परिषदेच्या काही शाळांनी यावेळी साहसी खेळाचे सादरीकरण केले. यावेळी शिवनेरी भूषण पुरस्काराचे वितरण देखील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. मराठा सेवा संघाच्या वतीने
शिवनेरी किल्ल्यावर आणलेली शिवाजी महाराजांची पालखी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी खांद्यावर घेऊन मिरवणुकीत सहभागी
झाले. शिवनेरी किल्ल्यावर कोणताही अनुचित
प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे एकाच हेलिकॉप्टरने सकाळी आठ वाजता शिवनेरी किल्ल्यावर आले, शिवजयंती सोहळा दीड तास शिवनेरी किल्ल्यावर पार पडला.