राजस्थान उच्च न्यायालयाकडून आसाराम बापूला मोठा दिलासा

जयपूर : लैंगिक शोषण प्रकरणात आजन्म सक्तमजुरीची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला राजस्थान उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. जोधपूर बलात्कार प्रकरणात त्याला उच्च न्यायालयाकडून ३१ मार्चपर्यंत अंतरिम जामीन मिळाला आहे. आसारामला बलात्काराच्या दोन प्रकरणांमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एक प्रकरण म्हणजे त्याच्या सुरत आश्रमात एका महिला अनुयायीवर बलात्कार झाल्याचे. दुसरे, जोधपूर आश्रमातील बलात्काराबद्दल आहे. ७ जानेवारी रोजी सुरत बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला. तसेच जोधपूर बलात्कार प्रकरणात उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. आता उच्च न्यायालयानेही जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आता न्यायालयाकडून आसाराम बापूला मोठा दिलासा मिळाला असल्याचे दिसून येत आहे. आरोग्याच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने आसारामला जामीन मंजूर केला होता. वृद्धापकाळ आणि खराब आरोग्याच्या आधारावर ही सवलत दिली जात असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.