धोत्री येथे महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी महिलांनी आजार अंगावर न काढता तातडीने उपचार घ्यावेत.

कुंभारी :  आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि संशोधन प्रगत असतानाही ग्रामीण भागातील महिलांमध्ये आजार अंगावर काढण्याचे प्रमाण अधिक आहे. महिलांनी आजाराची तीव्रता वाढण्याची वाट न पाहता तातडीने औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत माने यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त धोत्री (दक्षिण सोलापूर) येथे सन शुअर सोलार कंपनी आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात दोनशेहून अधिक महिला व मुलींना मोफत सॅनिटरी पॅड तसेच विविध आजारांवरील औषध व गोळ्यांचे वाटप करण्यात आले. धोत्री येथील मारुती मंदिरात झालेल्या या आरोग्य शिबिराचे उद्घाटन महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी डॉ. आस्था लाका यांनी महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. महिलांमध्ये रक्ताची कमतरता, थायरॉईड, संधिवात, मासिक पाळीतील तक्रारी, गाठी आणि पोटाचे विकार यांसारख्या आजारांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच, हे आजार टाळण्यासाठी योग्य काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शनही करण्यात आले. या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यास सरपंच संजय पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण माने, आरोग्य सेविका एस. बी. हिरेमठ, सन शुअर सोलार कंपनीचे तनवीर सिंह, एकता शर्मा, सचिन माने, घनश्याम सिंग, तुलिका रावत, परमेश्वर कांबळे, अनिल गायकवाड, सारिका शिंदे, सुनंदा नंदगावकर, सुषमा नवगिरे, राणी व्हटकर आदी मान्यवर उपस्थित होते.