पोलीस असल्याची बतावणी करुन लाखाची फसवणूक
.jpeg)
उमरगा, दि. १०-
पोलीस असल्याची बतावणी करुन एक लाख रुपयाला गंडा घालत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. उमरगा तालुक्यातील कराळी परिसरात ही घटना घडली आहे. नकली पोलिसांचा धुमाकूळ रोखण्याचे मोठे आव्हान जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्यासमोर उभे ठाकले आहे. फसवणूक केल्याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कदेर येथील रहिवासी बलभिम लक्ष्मणराव माने (वय ६०) आणि त्यांची
पत्नी हे दोघेजण कराळी पाटीपासून ते कराळी गावाकडे मोटारसायकलवरुन जात होते. दरम्यान, तीन अनोळखी इसमांनी दोन मोटारसायकलवर येऊन बलभिम माने यांच्या मोटारसायकलसमोर त्यांची मोटारसायकल उभी केली. आम्ही पोलीस डिपार्टमेंटचे लोक आहोत, अशी बतावणी करीत खोटे ओळखपत्र दाखवून काल रात्री येथे एका महिलेचे
दागिने लुटून मारहाण झाली आहे. तुम्ही तुमच्या गळ्यातील सोने व्यवस्थित सांभाळून तुमच्याजवळ ठेवा. असे सांगत बलभिम माने यांना बोलण्यात गुंतवून ठेवून ९८ हजार ७५० रुपये किमतीचे ३९ ग्रॅमचे सोन्याचे दागिने फसवणूक करून त्यांच्या ताब्यातून लांबविले. माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांच्या रुपात आलेल्या नकली पोलिसांवर उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जिल्ह्यात वारंवार अशा घटना घडत असल्याने नकली पोलिसांना शोधून काढण्याचे मोठे आव्हान खऱ्या पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.