श्री बसवारूढ मठाचे संस्थापक सद्गुरू ईश्वरानंद महास्वामी लिंगैक्य; आज चार वाजता मठातच समाधीसोहळा

सोलापूर : विमान तळाच्या मागील परिसरातील कस्तुरबा नगर येथील श्री बसवारूढ मठाचे संस्थापक सद्गुरू ईश्वरानंद महास्वामी बुधवारी मध्यरात्री लिंगैक्य झाले. बसवारूढ अप्पावरू नावाने प्रचलित असलेल्या ईश्वरानंद महास्वामी यांच्या देहावसानाचे वृत्त समजताच भक्तांमध्ये शोककळा पसरली आहे. महास्वामींच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास मठ परिसरात समाधीविधी संस्कार पार पडणार आहेत. तत्पूर्वी गुरूवार सकाळपासूनच अंत्यदर्शनासाठी  श्री बसवारूढ मठ, कस्तुरबा नगर (विमानतळाच्या मागे), सोलापूर येथे ठेवण्यात आले आहे. महास्वामींचे अंतिम दर्शन घेण्यासाठी भक्तांची रीघ लागली आहे. महास्वामींच्या अंतिम समाधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकसह आंध्रप्रदेश आणि तेलंगणातील भक्तही मोठ्या संख्येने सोलापूरकडे निघाल्याचे वृत्त आहे. श्री ईश्वरानंद महास्वामी यांनी समाजाला अध्यात्म, सेवा, निस्वार्थ भाव आणि भक्तीमार्ग यांचे महान मूल्य शिकवले. त्यांची साधी राहणी, गाढ ध्यानस्थ वृत्ती आणि प्रेमळ मार्गदर्शन यामुळे ते हजारो भक्तांच्या श्रद्धास्थानी होते. त्यांनी स्थापन केलेल्या श्री बसवारूढ मठाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले.