*माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास*

नवी दिल्ली: भारताचे माजी पंतप्रधान आणि आर्थिक उदारीकरणाचे शिल्पकार डॉ. मनमोहन सिंह यांचे आज निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वासोश्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

डॉ. मनमोहन सिंह यांनी भारताच्या आर्थिक विकासात मोलाची भूमिका बजावली होती. 1991 साली अर्थमंत्री म्हणून त्यांनी देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांची जगभर प्रशंसा झाली. त्यांची शांत, संयमी आणि दूरदृष्टीने परिपूर्ण नेतृत्वशैली आजही लोकांच्या स्मरणात आहे.   डॉ. सिंह हे 2004 ते 2014 या कालावधीत भारताचे पंतप्रधान होते. त्यांच्या कार्यकाळात भारताने आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठी प्रगती केली. त्यांच्या निधनानंतर देशभर शोककळा पसरली असून, जागतिक स्तरावरही हळहळ व्यक्त केली जात आहे.  डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाने देशाने एक विद्वान, दूरदृष्टीचा नेता आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात येत आहे.