माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे शिंदे सेनेच्या वाटेवर

उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन केली चर्चा ; अक्कलकोटमध्ये जंगी कार्यक्रमात होणार प्रवेश 

सोलापूर : अक्कलकोट मतदारसंघाचे चार टर्म आमदार राहिलेले काँग्रेसचे माजी ज़िल्हाध्यक्ष तथा माजी गृहराज्य मंत्री असलेले सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेसचा हात सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वाटेवर आहेत. म्हेत्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांची भेट घेऊन पक्ष प्रवेशाबाबत सविस्तर चर्चा केली.  अक्कलकोट येथे उपमुख्यमंत्राच्या साक्षीने ते शिवसेनेत जाणार असल्याच्या वृत्ताने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासून काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी आणि उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्के बसत आहेत. अनेक बडे नेते पक्ष सोडून जात आहेत. सोलापुरातही म्हेत्रे यांच्या रूपाने आता काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असून माजी मंत्री काँग्रेसला हात दाखवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  शिवसेनेचे धनुष्य बाण हाती घेणार आहेत.

म्हेत्रे यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी महेश साठे, महिला आघाडीच्या अनिता माळगे यांची उपस्थिती होती. त्याच वेळी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय म्हेत्रे यांनी घेतला.

दरम्यान शनिवार 31 मे रोजी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अक्कलकोट मध्ये म्हेत्रे यांचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. या कार्यक्रमाची अक्कलकोट तालुक्यात जोरदार तयारी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.