महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचे निधन

बंगळुरू, दि. १०- माजी परराष्ट्रमंत्री, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. दरम्यान, एस. एम. कृष्णा यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर जाहीर केला आहे. तसेच राज्य शासनाने बुधवारी सुट्टी जाहीर केली आहे. एस. एम. कृष्णा यांच्या सन्मानार्थ प्रमुख सरकारी कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाणार आहे. तीन दिवस कोणतेही शासकीय कार्यक्रम अथवा मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत, असे  कर्नाटक सरकारने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले की, कृष्णा यांच्यावर त्यांच्या मूळ गावी मद्दर येथे बुधवारी सायंकाळी ४ वाजता पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. बंगळुरूमध्ये उद्या (बुधवारी) सकाळी ८ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच बुधवारी मद्दरमध्ये सकाळी १०.३० ते दुपारी ३ दरम्यान त्यांचे अंत्यदर्शन घेता येईल, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. कृष्णा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री ते देशाचे परराष्ट्रमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल ाल आणि भारतीय राजकारणात १० वेगवेगळी पदे भूषविली होती. महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा त्यांनी २००८ रोजी राजीनामा दिला होता. २००९ मधील तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात ते परराष्ट्र व्यवहारमंत्री होते. त्यांनी मार्च २०१७ मध्ये अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला होता.