काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेप; १९८४ शीख विरोधी दंगली प्रकरणी ४० वर्षानंतर शिक्षा

नवीदिल्ली : १९८४
च्या शीख दंगलीशी संबंधित एका प्रकरणात काँग्रेस नेते आणि माजी खासदार सज्जन कुमार
यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने आज मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या दंगलींशी संबंधित एका प्रकरणात सज्जन सिंग यांना दिल्ली उच्च न्यायालयाने आधीच
जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून,सध्या ते तिहार तुरुंगातून शिक्षा भागेत
आहेत. १ नोव्हेंबर १९८४ रोजी दिल्लीत झालेल्या दंगलीवेळी सरस्वती विहार परिसरात
जमावाने पिता-पुत्राची हत्या केली होती . या प्रकरणी न्यायालयाने सज्जन कुमार
यांना १२ फेब्रुवारी रोजी दोषी ठरवले होते. आज दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने
त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी तत्कालीन पंतप्रधान
इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख अंगरक्षकांनी हत्या केली होती, त्यानंतर दिल्लीत दंगली उसळल्या होत्या. १ नोव्हेंबर १९८४ रोजी सरस्वती
विहार परिसरात शीख विरोधी दंगल उसळली होती. यावेळी जमावाने केलेल्या हल्ल्यात
सरदार जसवंत सिंग आणि सरदार तरुण दीप सिंग या पिता-पुत्राची हत्या करण्यात आली
होती. यावेळी जमावाला भडकविल्याचा सज्जन कुमार यांच्यावर आरोप होता. सज्जन
कुमारच्या चिथावणीनंतर जमावाने वडील आणि मुलाला त्यांच्या घरात जिवंत जाळल्याचा
आरोप आहे. जमावाने घराची तोडफोड, लूटमार आणि आग लावली.
घरातील इतर लोकांनाही मारहाण करून जखमी केले होते. सध्या सज्जन कुमार दिल्ली
कॅन्टमध्ये झालेल्या दुसऱ्या शीखविरोधी दंगल प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
आज सज्जन कुमारला तिहार तुरुंगातून न्यायालयात हजर करण्यात आले. दिल्लीत १९८४ मध्ये
झालेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणाच्या चौकशीसाठी २०१४ मध्ये केंद्र सरकारने विशेष
तपास तपथ (एसआयटी)ची स्थापना केली होती. विशेष तपास पथकाने (एसआयटी) जसवंत सिंग
यांच्या पत्नीला सज्जन कुमारविरुद्ध प्रत्यक्षदर्शी म्हणून सादर केले. तथापि,
सज्जन कुमार यांच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलांनी त्यांची साक्ष
नाकारण्याची मागणी केली होती.