बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे निधन; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनलिस्ट
पार्टी (बीएनपी) च्या अध्यक्षा बेगम खालिदा झिया यांचे ढाका येथील एव्हरकेअर
रुग्णालयात निधन झाले. त्या दीर्घकाळापासून आजारी होत्या आणि उपचार घेत होत्या.
त्यांच्या निधनामुळे बांगलादेशसह संपूर्ण दक्षिण आशियातील राजकीय वर्तुळात शोककळा
पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे त्यांच्या
निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. “माजी पंतप्रधान आणि बीएनपी अध्यक्षा बेगम
खालिदा झिया यांच्या ढाका येथे निधनाची बातमी ऐकून मला अत्यंत दुःख झाले आहे.
त्यांच्या कुटुंबीयांना आणि बांगलादेशातील जनतेला माझ्या मनःपूर्वक संवेदना. देव
त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो,” असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना पंतप्रधान मोदी
म्हणाले, “बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून
त्यांनी देशाच्या विकासात तसेच भारत-बांगलादेश संबंध दृढ करण्यात महत्त्वाची
भूमिका बजावली. २०१५ मध्ये ढाका येथे झालेली आमची भेट मला आजही आठवते. त्यांची
दूरदृष्टी आणि वारसा आमच्या द्विपक्षीय संबंधांना नेहमी मार्गदर्शन करत राहील.
त्यांच्या आत्म्याला शांती लाभो,” अशी श्रद्धांजली त्यांनी
अर्पण केली. दरम्यान, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) ने
जारी केलेल्या निवेदनानुसार, खालिदा झिया यांचे सकाळी ६
वाजता निधन झाले. त्या गेल्या ३६ दिवसांपासून एव्हरकेअर रुग्णालयात उपचार घेत
होत्या. पक्षाच्या नेत्यांनी व समर्थकांनी त्यांच्या
निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत, बांगलादेशच्या आधुनिक
राजकीय इतिहासातील एक प्रभावी नेत्या म्हणून त्यांचे स्मरण केले. बीएनपीच्या
निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही त्यांच्या आत्म्याच्या
शांतीसाठी प्रार्थना करतो आणि देशवासीयांनी त्यांच्या आत्म्याला शांती लाभो,
अशी प्रार्थना करावी,” असे आवाहन करण्यात आले
आहे. अनेक आजारांनी त्रस्त होत्या खालिदा झिया हृदय, फुफ्फुसे
आणि इतर गंभीर आजारांमुळे खालिदा झिया यांना २३ नोव्हेंबर रोजी खासगी रुग्णालयात
दाखल करण्यात आले होते. बांगलादेशी माध्यमांच्या माहितीनुसार, शेवटच्या आठवड्यात त्यांना न्यूमोनियाचाही त्रास झाला होता. याशिवाय त्या
यकृत सिरोसिस, मधुमेह, संधिवात तसेच
मूत्रपिंड, हृदय व डोळ्यांशी संबंधित दीर्घकालीन आजारांनी
त्रस्त होत्या. त्यांच्यावर बांगलादेशासह युनायटेड किंग्डम, अमेरिका,
चीन आणि ऑस्ट्रेलिया येथील डॉक्टरांचा समावेश असलेल्या
बहुविद्याशाखीय वैद्यकीय पथकाद्वारे उपचार सुरू होते. चांगल्या उपचारांसाठी
परदेशात पाठवण्याबाबत चर्चा झाली होती, मात्र प्रकृती अत्यंत
नाजूक असल्याने डॉक्टरांनी आंतरराष्ट्रीय प्रवासास मनाई केली होती.