सीईटी परीक्षा केंद्रावर जानवे काढल्याचा प्रकार; ब्राह्मण समाजाकडून तीव्र निषेध

विजयपूर बीदर आणि शिमोगा येथील सीईटी (CET) परीक्षा केंद्रावर ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांचे यज्ञोपवीत (जानवे) जबरदस्तीने काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या घटनेचा ब्राह्मण समाजात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. या संदर्भात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष रोहन विनय आपटे, तसेच गोपाळ नाईक, प्रकाश अक्कलकोट, विजय जोशी, राकेश कुलकर्णी, व्यंकटेश जोशी, गुरुराज राव आदी समाजप्रमुखांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, “या प्रकाराने आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. यज्ञोपवीत बदलण्यासाठी विशिष्ट धार्मिक प्रक्रिया असते. परीक्षा केंद्रावर जबरदस्तीने जानवे काढण्याचे कृत्य अत्यंत निंदनीय आहे.प्रसिद्धीपत्रकात सीईटीकडून अशाप्रकारे कोणतीही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे हे कृत्य म्हणजे ब्राह्मण समाजाच्या संविधानिक हक्कांवर घाला असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी मागणी केली की, "या प्रकाराची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्याला त्वरित निलंबित करण्यात यावे आणि अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शासन आणि प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात."ब्राह्मण समाज शांतताप्रिय असला तरी धार्मिक भावनांवर आघात झाल्यास तो सहन केला जाणार नाही," असा स्पष्ट इशाराही या पत्रकात देण्यात आला आहे.