ड्युटीवेळी मसाज व स्वच्छतेची जबरदस्ती; उपायुक्तांवर गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनगर : प्रादेशिक समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त जयश्री सोनकवडे यांच्यावर त्यांच्या घरी शासकीय कर्मचाऱ्याकडून वैयक्तिक कामे करवून घेण्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कौशल्या गायकवाड या 2023 पासून विभागाच्या वसतिगृह यूनिट क्रमांक 4 मध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आरोप केला की, जयश्री सोनकवडे यांनी त्यांना घरी बोलावून भांडीकुंडी घासणे, फरशी पुसणे आणि स्वतःसह त्यांच्या आईचे मसाज करण्यास सक्ती केली. कौशल्या यांनी याचे व्हिडिओ आणि फोटो पुरावे म्हणून सादर केले, जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दृश्यांमध्ये त्या घरी स्वच्छता करताना दिसत असल्याने या आरोपांना बळ मिळाले आहे. कौशल्या गायकवाड यांनी सांगितले, "मी विरोध केला तर ‘नोकरीवरून काढून टाकीन’ अशा धमक्या दिल्या. या अन्यायाला मी कंटाळले आणि शेवटी हा प्रकार बाहेर आणला." यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "ही बाब अत्यंत गंभीर आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल." जयश्री सोनकवडे यांनी मात्र या आरोपांचे खंडन केले असून, "हे सर्व आरोप खोडसाळ आहेत. माझी प्रतिमा मलिन करण्याचा हा कट आहे. माझे खासगी फोटो आणि व्हिडिओ बेकायदेशीरपणे पसरवण्यात आले. मी याबाबत पोलिसांत तक्रार केली असून, कायदेशीर कारवाई करणार आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाने आता कायदेशीर वळण घेतले असून चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. याआधीही समाज कल्याण विभागावर गैरप्रकारांचे आरोप होत आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपशीलवार तपास कसा होतो, दोषींवर कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.