फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी भारतात दाखल; GOAT इंडिया टूरला कोलकात्यात सुरुवात
दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी ‘GOAT इंडिया टूर’ अंतर्गत भारतात दाखल झाला आहे. UNICEF चा
ब्रँड अँबेसेडर असलेला मेस्सी या उपक्रमाच्या माध्यमातून भारत भेटीवर आहे.
कोलकातामधील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर तो पहाटे सुमारे 3
वाजता पोहोचला. त्याच्यासोबत फुटबॉलपटू लुईस सुआरेझ आणि रॉड्रिगो डी
पॉल देखील भारतात आले आहेत. 2022 फिफा वर्ल्ड कप विजेत्या
अर्जेंटिना संघाचा कर्णधार असलेल्या मेस्सीच्या भारत दौऱ्याची सुरुवात
कोलकात्यातून झाली आहे. या तीन दिवसीय दौऱ्यात तो कोलकाता, हैदराबाद,
मुंबई आणि नवी दिल्ली या चार शहरांना भेट देणार आहे. मेस्सीच्या
आगमनाने कोलकात्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. हजारो चाहते रस्त्यावर उतरून
‘मेस्सी, मेस्सी’च्या घोषणांनी त्याचे स्वागत करत होते.
चाहत्यांच्या हातात अर्जेंटिनाची जर्सी, झेंडे, बॅनर आणि पोस्टर्स दिसत होते. कोलकात्यात मेस्सी त्याच्या 70 फूट उंच पुतळ्याचे अनावरण करणार आहे. यानंतर साल्ट लेक स्टेडियममध्ये
संगीत कार्यक्रम आणि मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी
माजी भारतीय क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली, बॉलिवूड
सुपरस्टार शाहरुख खान तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची
उपस्थिती असण्याची शक्यता आहे. कोलकात्यानंतर मेस्सी हैदराबादला रवाना होणार असून,
राजीव गांधी क्रिकेट स्टेडियममध्ये त्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात
आला आहे. शनिवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्या संघाविरुद्ध
मैत्रीपूर्ण सामना खेळला जाणार आहे. त्यानंतर तो मुंबईमार्गे नवी दिल्लीला जाणार
असून, 15 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
घेणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये कार्यक्रमात सहभागी होऊन मेस्सी
भारत दौऱ्याचा समारोप करणार आहे.