सोलापूर गारमेंट पार्कसाठी खासदार प्रणिती शिंदेकडून पाठपुरावा; चादरींच्या बनावट उत्पादनावर कारवाईची केली मागणी

नवी दिल्ली: सोलापुरात गारमेंट पार्क स्थापन करण्याचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या संदर्भात खासदार प्रणिती शिंदे यांनी दिल्ली येथे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांची भेट घेऊन पाठपुरावा केला आहे. सोलापुरात स्वतंत्र गारमेंट पार्क आणि सोलापूर चादरीच्या बनावटी करणाविरोधात कारवाई करण्याबाबतचे पत्र खासदार प्रणिती शिंदे यांनी सिंग यांना दिले आहे. सोलापूरच्या प्रश्नावर खासदार प्रणिती शिंदे नेहमीच सकारात्मक भूमिका घेताना दिसून येत आहेत. नुकतेच त्यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांची भेट घेऊन सोलापूर टेक्सटाईल पार्कच्या अनुषंगाने चर्चा केली. यावेळी दिलेल्या पत्रात त्यांनी सोलापूर हे एक देशातील महत्त्वाचे वस्त्र उत्पादन केंद्र आहे, विशेषतः टॉवेल, बेडशीट आणि गणवेश निर्मितीत सोलापूर अग्रेसर आहे. परंतू सोलापूरमधील या वस्त्र उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जागतिक स्तरावर स्पर्धेत टिकण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधांनी सुसज्ज अशा स्वतंत्र गारमेंट पार्कची आवश्यकता असल्याच्या गोष्टीकडे लक्ष वेधले. सोलापुरातील या गारमेंट पार्कमुळे येथील वस्त्रोद्योग व्यावसायिकांना सर्व आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी मिळू शकतील. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास चालना मिळाल्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता वाढवता येईल.परिणामी निर्यात वाढवून सोलापूरच्या वस्त्र उद्योगाला जागतिक बाजारपेठेत अधिक चांगल्या पद्धतीने स्पर्धा करता येईल. या उपक्रमामुळे हजारो स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. त्यामुळे वस्त्रोद्योगाच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकारने  या गारमेंट पार्कच्या निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.

सोलापूर चादरीच्या बनावटी विरोधात कारवाई करा

याच बरोबर खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर चादर उत्पादनास मारक ठरणाऱ्या बनावट चादररीचा मुद्दा देखील मंत्री गिरिराज सिंग यांच्या पुढे मांडला. सोलापूर चादरीच्या अनधिकृत बनावटीकरणामुळे मूळ विणकरांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. सोलापूर चादर ही भौगोलिक निर्देशांक (GI) प्रमाणपत्र प्राप्त असलेली उत्पादने असून, ती स्थानिक विणकरांच्या कौशल्याचे प्रतीक आहे. परंतु सद्या बाजारात बनावट चादरींच्या विक्रीमुळे अस्सल चादर उत्पादक विणकरांना आर्थिक फटका बसत असल्याच्या गोष्टीकडे खासदार शिंदे यांनी लक्ष वेधले. या प्रकरणी स्थानिक उद्योजक आणि विणकर संघटनांकडून या नकली उत्पादकांवर कठोर कायदेशीर पावले उचलण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने जीआय कायद्याची कडक अंमलबजावणी करावी आणि बाजारात अधिक काटेकोरपणे निरीक्षण करावे. तसेच सोलापूरच्या अस्सल चादर निर्मितीच्या कलेचा सन्मान राखण्यासाठी नकली उत्पादनांच्या विक्रीवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी मंत्र्यांकडे केली आहे. यावर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली.