चीनमध्ये महापूराचा कहर : ज्वेलरी शॉपमधील १२ कोटींचे दागिने वाहून गेले

चीनच्या शांक्सी प्रांतात आलेल्या महापुरामुळे वुची काउंटीतील लाओफेंग्झियांग या प्रसिद्ध ज्वेलरी शॉपमध्ये पाणी घुसले. दुकान उघडे नसतानाही पाण्याच्या लोंढ्यामुळे सुमारे २० किलो सोने, हिऱ्याचे आणि चांदीचे दागिने, तसेच दुकानातील एक तिजोरीसह लाखो युआनचा माल वाहून गेला. दुकानात प्रदर्शनासाठी ठेवलेले दागिने — सोन्याच्या साखळ्या, बांगड्या, अंगठ्या, कानातले, हिऱ्याच्या अंगठ्या, जेड स्टोन व चांदीचे दागिने — पुराच्या पाण्यात मिसळले. या घटनेनंतर नागरिक चिखलात मेटल डिटेक्टर घेऊन दागिने शोधू लागले. दुकानदाराच्या मुलानुसार, आतापर्यंत काहींनी १ किलो सोने शोधून परत केले असले तरी बहुतेकांनी सापडलेले दागिने स्वतःकडेच ठेवले आहेत. पुरामुळे वीज गेल्याने सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. त्यामुळे नेमकं किती माल चोरीला गेला हे अजून अस्पष्ट आहे. पोलिसांनी लोकांना सापडलेले दागिने परत करण्याचे आवाहन केले असून, दुकानदाराने ही माहिती दडपणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. या दागिन्यांची एकूण अंदाजे किंमत १ कोटी युआन (१२ कोटी रुपये) असल्याचं सांगण्यात येत आहे.