कर्नाटकमध्ये विषबाधेने पाच वाघांचा मृत्यू; वन विभागाचा तपास सुरू

बेळगाव – कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील एमएम हिल्स (महाडेश्वर टेकड्या) परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. हुग्याम वनक्षेत्रात एका वाघिणी आणि तिच्या चार पिल्लांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी कर्मचाऱ्यांना नियमित गस्तीदरम्यान गायीचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर वाघिणी आणि तिच्या पिल्लांचे मृतदेह सापडले. प्राथमिक तपासानुसार, अज्ञात व्यक्तींनी गायीला विष घातले असावे. त्या गायीचे मांस खाल्ल्याने वाघिणी व बछड्यांचा मृत्यू झाला, असा अंदाज व्यक्त होत आहे. कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खंदारे यांनी सांगितले की, “सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोषींना कठोर शिक्षा केली जाईल.” गुरुवारी वाघिणीचे शवविच्छेदन करण्यात आले असून, चार पिल्ल्यांचेही शवविच्छेदन सुरू आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रोटोकॉलनुसार विषशास्त्र, डीएनए प्रोफाइलिंग व इतर चाचण्या करण्यात येत आहेत. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, ही घटना केवळ सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीच नव्हे, तर मानवी हस्तक्षेप व शिकारीच्या वाढत्या घटनांचा गंभीर इशारा आहे. पावसाळ्यात वन्य प्राणी मानवी वस्तीजवळ येतात, त्यामुळे यासारखे प्रकार होण्याचा धोका वाढतो. या घटनेनंतर हुग्याम रेंजमध्ये ड्रोन, इन्फ्रारेड कॅमेरे आणि जीपीएस-आधारित गस्त वाढवण्यात आली आहे. सर्व शिकारविरोधी छावण्या हाय अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या २०२२ अहवालानुसार, कर्नाटकमध्ये ५६३ वाघ आहेत. मध्य प्रदेश (785 वाघ) आणि उत्तराखंड (५६० वाघ) यांच्यानंतर कर्नाटकमधील वाघांची संख्या देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.