सोलापूर–पुणे महामार्गावर भीषण अपघात; अक्कलकोटला दर्शनासाठी निघालेल्या पाच भाविकांचा मृत्यू
सोलापूर– पुणे महामार्गावरील मोहोळ तालुक्यातील देवडी
फाट्याजवळ रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव कारचा ताबा सुटल्याने
वाहन थेट झाडावर आदळले. या अपघातात पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण
गंभीर जखमी आहे. मृत सर्व भाविक हे पनवेल (जि. रायगड) येथील रहिवासी असून ते अक्कलकोट
येथे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी निघाले होते. एमएच ४६ झेड ४५३६
क्रमांकाच्या कारमधून सहा जण प्रवास करत होते. कारमध्ये तीन पुरुष आणि तीन महिला
होत्या. अपघात इतका भीषण होता की कारचा चेंदामेंदा झाला असून मृतदेह वाहनात
अडकलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे अधिकारी
व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमीला बाहेर काढून
मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीसांकडून
मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून अपघाताचे नेमके कारण तपासले जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, वाहनाचा वेग जास्त असल्याने चालकाचा ताबा
सुटल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त
केली जात असून दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर अचानक ओढवलेल्या या संकटाने
सर्वत्र शोककळा पसरली आहे.