आधी आग्रा विमानतळ उडवण्याची धमकी, नंतर ताजमहालजवळ गोळीबार; पोलीस बॅरिकेडिंगजवळ घटना

सोमवारी सकाळी आग्रा येथे ताजमहालजवळ गोळीबाराची घटना घडल्यामुळे मोठी खळबळ उडाली. या घटनेने पर्यटनस्थळावरील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे, याच्यापूर्वी रविवारी आग्रा विमानतळ उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल प्रशासनाला मिळाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, दोन तरुण दुचाकीवरून अमरूद टीला भागात पोहोचले आणि ताजमहालच्या पश्चिम पार्किंगजवळील बॅरिकेडजवळ हवाई गोळीबार केला. या गोळीबारामुळे तिथे असलेल्या पर्यटकांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली. गोळीबार झाल्यानंतर दोन्ही आरोपी युवक दुचाकीवरून पळून गेले. त्यांच्या दुचाकीवर मथुराचा क्रमांक होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस व सुरक्षा यंत्रणा तातडीने सक्रिय झाल्या. सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, या गोळीबारामागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. रविवारी आलेल्या धमकीच्या ईमेलमध्ये लिहिले होते की, “विमानतळाभोवती स्फोटकांनी भरलेल्या पिशव्या ठेवल्या आहेत.” या इशाऱ्यामुळे प्रशासन सज्ज झाले असतानाच ताजमहालजवळ घडलेली ही घटना आणखी गंभीर ठरली आहे. ताजमहालसारख्या संवेदनशील जागेच्या ५०० मीटर अंतरावर गोळीबार होणे ही चिंतेची बाब मानली जात आहे. सुरक्षा यंत्रणांनी या घटनेचा सर्व बाजूंनी तपास सुरू केला असून आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.