बिबट्याची भीती, शाळेला सुट्टी
.jpeg)
सेनापती कापशी : कागल तालुक्यातील बोळावी येथे
बिबट्याच्या भीतीपोटी विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवली आहे.
वनविभागाच्या दुर्लक्षामुळे वन्य प्राण्यांचा गावच्या परिसरात वावर वाढल्याने
मुलांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा वन
विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. बोळावी
येथे इयत्ता ७ वी पर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत बोळावीवाडी,
ठाणेवाडी, हाळवाडी येथून विद्यार्थी शाळेला
येतात. सकाळी एसटीने व संध्याकाळी एसटी नसल्याने पायी चालत जावे लागते.
रस्त्याच्या दुतर्फा जंगलव्याप्त भाग आहे. त्यातच मागील आठवड्यात बिबट्याच्या
दर्शनाने ग्रामस्थ व मुलांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे बिबट्याच्या भीतीपोटी मुले
शाळेला जाणे टाळत आहेत. यापूर्वीही बिबट्या या भागातून फिरत होता. मात्र, वन विभागाने तरस असल्याचे जाहीर केल्यामुळे त्याकडे लक्ष दिले नाही;
परंतु प्रत्यक्ष बिबट्याचे दर्शन झाल्याने वन अधिकारी जागे झाले.
कोल्हापूर वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत ड्रोनद्वारे बिबट्याचा शोध
घेतला. यामध्ये रान डुकरे, गवे आदी रानटी जनावरांचे दर्शन
झाले. मात्र विबट्याचा काही शोध लागला नाही. परंतु एवढ्यापुरते वनविभागाने काम
करून नंतर त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. यासाठी कायम स्वरूपी वनपाल, वनरक्षक यांनी जंगल परिसरात लक्ष दिल्यास ग्रामस्थ व मुलांमधील भीती कमी
होऊन मुले बिनधास्त शाळेला जातील आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल.