जळगावात भीषण अपघात; डंपरच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू, मैत्रीण गंभीर

जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात २१ वर्षीय चंचल लांडगे हिचा जागीच मृत्यू झाला, तर तिची मैत्रीण वैष्णवी चौधरी गंभीर जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंचल लांडगे आणि वैष्णवी चौधरी या दोघी दुचाकीवरून चंचलच्या आईला भेटण्यासाठी जात होत्या. दसेगाव फाट्याजवळ पोहोचल्यावर मागून भरधाव वेगाने आलेल्या वाळूच्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत चंचलच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ती डंपरखाली चिरडली गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की दोघींना काही अंतर फरफटत नेण्यात आले. वैष्णवी चौधरी हिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, संबंधित डंपरमध्ये अवैध वाळू वाहतूक होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी डंपर ताब्यात घेत चालक आणि क्लिनरला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. यापूर्वीही जळगाव जिल्ह्यात अशाच अपघातांत जीवितहानी झाल्याने रस्ते सुरक्षा आणि अवैध वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.