FASTag अनिवार्य: 1 एप्रिलपासून महाराष्ट्रातील सर्व टोल नाक्यांवर फक्त FASTag पेमेंटच स्वीकारले जाणार

मुंबई: 1 एप्रिलपासून महाराष्ट्रातील सर्व टोल नाक्यांवर फक्त FASTag द्वारा टोल वसुली केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हा निर्णय घेतला असून, FASTag नसलेल्या वाहनांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे.

यापूर्वी, एमएसआरडीसीच्या टोल नाक्यांवर हायब्रीड पद्धतीने टोल स्वीकारला जात होता, जिथे रोख रक्कम, स्मार्ट कार्ड, डेबिट कार्ड, पीओएस मशीन किंवा क्युआर कोडद्वारे भरणा करता येत होता. मात्र, आता केवळ FASTag द्वारेच टोल स्वीकारला जाणार आहे.

FASTag नसल्यास दुप्पट टोल द्यावा लागेल

नव्या निर्णयानुसार, जर वाहन चालक यूपीआय, कार्ड किंवा रोकडने टोल भरत असतील, तर त्यांना दुप्पट टोल द्यावा लागेल. त्यामुळे वाहन चालकांनी तातडीने FASTag लावण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या टोल नाक्यांवर FASTag अनिवार्य:

एमएसआरडीसीच्या 9 प्रमुख रस्ते प्रकल्पांतर्गत येणाऱ्या टोल नाक्यांवर FASTag बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामध्ये हे टोल नाके समाविष्ट आहेत:

1.       वांद्रे-वरळी सागरी सेतू

2.      मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि जुना मार्ग

3.      मुंबई प्रवेशद्वारावरील 5 टोल नाके

4.      समृद्धी महामार्गावरील 23 टोल नाके

5.      नागपूर शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील 5 टोल नाके

6.     सोलापूर शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील 4 टोल नाके

7.      संभाजीनगर शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील 3 टोल नाके

8.     काटोल बायपास

9.     चिमूर-वरोरा-वणी टोल नाके

समृद्धी महामार्गावरील टोलमध्ये 19% वाढ

एमएसआरडीसीने समृद्धी महामार्गावरील टोलमध्ये 19 टक्के वाढ केली आहे. त्यामुळे मुंबई ते नागपूर प्रवासासाठी कार चालकांना आता 1,445 रुपये टोल द्यावा लागणार आहे. नव्या दरांची अंमलबजावणी 31 मार्च 2028 पर्यंत करण्यात येणार आहे.

FASTagचा फायदा:

  • टोल नाक्यांवर गाड्यांची रांग लागत नाही.
  • प्रवासाचा वेळ वाचतो.
  • डिजिटल पेमेंटमुळे व्यवहार पारदर्शक होतो.

एमएसआरडीसीच्या नव्या नियमांमुळे वाहनचालकांनी तातडीने FASTag लावणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांना दुप्पट टोल द्यावा लागेल.