तिर्हे येथे शेतकऱ्याचा बैलासह तळ्यात बुडून मृत्यू

सोलापूर: उत्तर सोलापूर तालुक्यातील तिर्हे येथे गुढी पाडव्याच्या दिवशी शेतकरी अंकुश काशीनाथ सिरसट (वय ५५) यांचा बैलासह तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी घडली. सिरसट आपल्या बैलजोडीसह सिद्धनाथ कारखाना मागील तळ्यावर बैलगाडी धुण्यासाठी गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने बैलगाडी तळ्याच्या मध्यभागी गेली. अचानक गाडी पाण्यात पलटी झाल्याने शेतकरी आणि बैल पाण्यात बुडाले. आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी एक बैल वाचवला, मात्र शेतकरी सिरसट आणि दुसरा बैल पाण्यात गेला. घटनेची माहिती मिळताच महसूल आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी भेट दिली. या घटनेमुळे तिर्हे गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत शेतकऱ्यामागे पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.