झाडबुके महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचा निरोप

बार्शी: येथील श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा  उत्साहात पार पडला. सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयाचे भूगोल प्रमुख डॉ. वीरभद्र दंडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी सोलापूरचे डीएव्ही वेलणकर कॉमर्स कॉलेज चे डॉ. दीपक ननवरे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज गादेकर होते. यावेळी बोलताना डॉ. दंडे म्हणाले, चिकाटी हा यशाचा महत्त्वाचा गुण असून, आत्मविश्वासाने परीक्षा देऊन विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणाला सर्वोच्च स्थान द्यावे, परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब न करता कठोर मेहनतीच्या जोरावर यश संपादन करावे,असे मत डॉ. ननवरे यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात बोलताना डॉ. मनोज गादेकर यांनी, “विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे नाव मोठे करण्यासाठी प्रयत्नशील राहावे व परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करावे, असे सांगितले.यावेळी उपप्राचार्य प्रा. भास्कर करडे आणि पर्यवेक्षक प्रा. सतीश रणदिवे यांचीही विशेष उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयात वर्षभर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन  वैष्णवी भागवत हिने केले. समारंभाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि इयत्ता अकरावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.