फडणवीस -शिंदे मतभेद उघड

मुंबई : राज्य
सरकारने अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन
केलेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना
स्थान देतानाच उपमुख्यमंत्री शिंदे यांना वगळण्यात आले आहे. यामुळे शिंदे आणि
फडणवीस यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे. फडणवीस यांच्या
अध्यक्षतेखालील नव्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या स्थापनेचा शासन निर्णय ६
फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आला. या समितीत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मदत व पुनवर्सन
मंत्री मकरंद जाधव-पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश
आबिटकर या मंत्र्यांना सदस्यपदी नेमण्यात आले आहे. मात्र, एकनाथ
शिंदे हे राज्याचे नगरविकास व गृहनिर्माण मंत्री असूनही त्यांना आपत्ती व्यवस्थापन
समितीमधून वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राज्यात आपत्ती
व्यवस्थापन करण्यात राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका सर्वात मोठी भूमिका
बजावतात. असे असताना या सर्व महानगरपालिका व नगरपालिका ज्या नगरविकास विभागाच्या
अंतर्गत काम करतात त्याच खात्याचे मंत्री असलेल्या शिंदेंना आपत्ती व्यवस्थापन
समितीतच स्थान नाकारण्यात आले आहे. या खात्याचे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या
माध्यमातून यंत्रणा आणि मदत संबंधित घटनास्थळापर्यंत पोहोचवली जाते. यामुळे फडणवीस
आणि शिंदे यांच्यातील राजकीय वाद शिगेला तर पोहोचला नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे.
पालकमंत्रिपदावरून झाली होती रस्सीखेच
राज्यात महायुती सरकार आल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात स्पर्धा पाहायला मिळाली. या दोघांमध्ये
अनेक मुद्द्यांवरून अंतर्गत संघर्ष असल्याच्या चर्चा होत्या. नाराज झालेले शिंदे
हे सतत दरे या गावी व्हिजनवासात गेलेले पाहायला मिळाले. अगदी अलीकडे
पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष झाल्याचे चित्र दिसले
होते. हा संघर्ष इतका टोकाला गेला होता की, रायगड आणि नाशिकच्या जाहीर झालेल्या
पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली होती.