नागपूर जवळील ॲल्युमिनियम कारखान्यात स्फोट, ५ ठार

नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील उमरेड एमआयडीसी
परिसरातील एमएमपी अल्युमिनियम फॉइल आणि पावडर तयार करणाऱ्या कंपनीत शुक्रवारी
रात्री स्फोट झाला. या स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली आणि आतापर्यंत ५
कामगारांचा मृत्यू झाला. यातील दोघांचा नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात उपचारादरम्यान
मृत्यू झाला, तर दोन कामगारांचे मृतदेह सापडले.
अद्याप एकाचा शोध लागलेला नाही. आग धुमसत असल्याने तपासात अडचणी येत आहेत. या
घटनेच्या वेळी कंपनीत दीडशे कामगार कामावर होते, त्यामुळे अद्याप एक जण अडकला
असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही कामगार जीवाच्या आकांताने बाहेर
पडल्यामुळे सुदैवाने बचावले. या स्फोटाच्या आणि आगीच्या घटनेत ११ कामगार गंभीर
जखमी झाले, यापैकी दोघांची प्रकृती गंभीर होती
आणि त्यांचा मृत्यू झाला. या कंपनीचे नाव एमएमपी आहे, आणि रात्री
सातच्या सुमारास स्फोट झाल्यानंतर आग लागली. नागपूर आणि उमरेड येथून अग्निशमन
यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली, परंतु आग केमिकल असल्यामुळे
पहाटेपर्यंत ती धुमसत होती. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आणि जिल्हा पोलिस
अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल
झाले. या घटनेमागचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. जखमींना नागपूरच्या मेडिकल
कॉलेज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे. महत्वाचे
म्हणजे, या
कंपनीमध्ये अल्युमिनियम पावडर असल्याने आग लगेच विझवता येत नाही. पावडर जळून खाक
झाल्यानंतरच आग आटोक्यात येईल, अशी माहिती पोलीस आणि अग्निशमन
विभागाने दिली आहे.