रस्ते, सिंचन, आरोग्य सुविधांची अपेक्षा

करमाळा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र
पवार पक्षाचे नारायण पाटील यांनी निवडणूक रिंगणातील अपक्ष उमेदवार संजय शिंदे
यांचा पराभव करत आमदारकीची खुर्ची पुन्हा मिळविली. नूतन आमदार पाटील यांच्याकडून
मतदारसंघातील रस्ते, सिंचन, आरोग्य
सुविधांची पूर्तता व्हावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.
नारायण पाटील यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवून
विजय प्राप्त केला. आता त्यांना मतदारसंघातील करमाळा तालुक्यातील ११८ आणि माढा
तालुक्यातील ३६ गावांतील नागरिकांना अपेक्षित असणाऱ्या कामांना गती देण्यासाठी
पाठपुरावा करावा लागणार आहे. या अपेक्षित कामांमध्ये प्रामुख्याने रिटेवाडी उपसा
सिंचन मार्गी लावणे, उजनी धरणातून बेंद ओढ्यात पाणी
सोडण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणे, गेल्या कित्येक काळापासून
रखडलेला टेंभुर्णी-करमाळा-जातेगाव रस्त्याचे काम पूर्ण करणे, मांगी तलावात कुकडीचे पाणी कायमस्वरूपी येण्यासाठी प्रयत्न करणे, एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग येऊन रोजगाराची उपलब्धता होण्यासाठी पाठपुरावा
करणे, पोलीस वसाहत तसेच नवीन प्रशासकीय
करमाळा
किशोरकुमार शिंदे
इमारती उभारल्या जाणे, उजनी, सीना कोळेगाव
धरणातील पाण्याचे नियोजन, धरणग्रस्तांना सुविधा, विजेचे प्रश्न सोडविणे अशा कामांचा समावेश आहे. बस आगारातील एसटी
गाड्यांची अवस्था फारच दयनीय आहे. प्रवासी वाहतूक होताना गाड्या बंद पडत असल्याने
प्रवासी हैराण होतात. या पार्श्वभूमीवर नवीन एसटी गाड्यांसाठी प्रयत्न होण्याची नागरिकांना
अपेक्षा आहे. तालुक्याचा विचार करता पर्यटन वाढीसाठी विशेष प्रकल्प राबविले जाणे,
आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी पाठपुरावा होणे, शासकीय
आस्थापनामध्ये पुरेसे अधिकारी, कर्मचारी संख्याबळ असण्यासाठी
प्रयत्न करणे आवश्यक आहे.
मतदारसंघातील करमाळा, कुडूवाडीमध्ये अंतर्गत रस्ते व इतर
सुविधा उपलब्ध व्हाव्यात, मोठ्या गावांमध्ये बाजारपेठेला
चालना मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत, केम येथील कुंकू
कारखानदारांना सोयी उपलब्ध व्हाव्यात तसेच करमाळा तालुका ऊस व केळीचा मोठा
पुरवठादार असताना उत्पादकांना जास्त नफा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत,
सर्वसामान्य नागरिकांचा थेट संबंध असणाऱ्या कार्यालयात गतिमानता आणि
पारदर्शकता यावी. तालुक्यातून काही नवीन रेल्वे मार्गाचे नियोजन होणे, अशाही नागरिकांच्या अपेक्षा असल्याचे समोर येत आहे.