बार्शीतील महावितरणचे कार्यकारी अभियंता निलंबित

बार्शी : बार्शीतील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) कार्यालयात कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता सुरेश कुऱ्हाडे यांना गंभीर आर्थिक अनियमिततेच्या आरोपांवरून तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने यासंदर्भात आदेश दिले आहेत. कुऱ्हाडे यांनी महावितरणच्या धोरणांचे उल्लंघन करत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी असलेल्या थेट लॉटरी पध्दतीने काम वाटपाच्या नियमांचे पालन न केल्याचे आढळले आहे. २०१५ च्या शासन निर्णयानुसार एका वेळी दिल्या जाणाऱ्या कामाची कमाल मर्यादा १० लाख रुपये आहे. मात्र, कुऱ्हाडे यांनी या मर्यादेचे उल्लंघन करत पाच ठेकेदारांना प्रत्येकी १० लाखांपेक्षा अधिक रकमेच्या कामांचे आदेश दिले. सोलापूर मंडल कार्यालयाने दिलेल्या निर्देशांपेक्षा जास्त रकमेच्या कामांचे आदेश दिल्याने महावितरणने ही कारवाई केली आहे. महावितरण कर्मचारी सेवाविनियम २००५ अंतर्गत सेवा विनियम क्र. ८ ८ (क) आणि अनुसूची ‘ग’ नुसार मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी सुरेश कुऱ्हाडे यांना पुढील आदेश येईपर्यंत निलंबित केले आहे.