फुलपाखरासारखे जगण्याची उमेद प्रत्येक माणसाची असते : शिंदे

सोलापूर, दि. २५- फुलपाखरासारखे जगण्याची उमेद प्रत्येक माणसाची असते. ज्येष्ठ नागरिक जीवनामध्ये साहित्य, चित्रपट, संगीत, गाणी यांचा आनंद घेत आपले जीवन व्यतीत करीत असतात. अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कर्तृत्वाचा आज सन्मान झाला असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. शुक्रवारी, डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात करुणाशील समितीच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्या मान्यवरांना चंद्रप्रकाशी अमृतयात्री जीवनगौरव पुरस्कार शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध नाट्य कलावंत सुनील गोडबोले तर विशेष अतिथी म्हणून उद्योजक तथा मराठी साहित्य परिषद सोलापूरचे उपाध्यक्ष दत्ता सुरवसे उपस्थित होते. ज्येष्ठ कामगार नेते रामभाऊ गणाचार्य, ज्येष्ठ विचारवंत दत्ता गायकवाड, ज्येष्ठ परिवर्तनवादी शाहिरी कलावंत प्रा. डॉ. अजिज नदाफ, दयानंद महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य प्रा. डॉ. वसंतराव बनसुडे, संगमेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य नरेश बदनोरे, ज्येष्ठ समाजसेवक मल्लिकार्जुन पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी राजकुमार खरटमल, ज्येष्ठ विधिज्ञ जे. जे. कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिक सुरेखा शहा, ज्येष्ठ विचारवंत डॉ. नसीम पठाण, ज्येष्ठ अभिनेत्री प्रा. विद्या काळे आणि सुशीला व्हनसाळे यांचा यावेळी चंद्रप्रकाशी अमृतयात्री जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी आपल्या भाषणात शिंदे यांनी पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. अनेक जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. प्रमुख पाहुणे सुनील गोडबोले यावेळी बोलताना म्हणाले, सुबक रांगोळी काढताना विविध रंग वापरले जातात. आपल्या आयुष्यातही रांगोळीसारखे जीवनाच्या वाटचालीत विविध रंग भरले तर आपल्यालाही त्याचा आनंद मिळेल. पुरस्कार प्राप्त दत्ता गायकवाड, प्रा.डॉ.नसीम पठाण, अँड.जे.जे.कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले. पुरस्काराबद्दल समितीविषयी क्रुतज्ञता व्यक्त केली.संयोजक आशुतोष नाटकर यांनी प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी तर आभार प्रदर्शन मारुती कटकधोंड यांनी केले.
साधी राहणी, उच्च विचारसरणी
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या
भाषणात प्रत्येक पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या कार्याचा गौरव केला. ज्येष्ठ
विधीज्ञ धनंजय माने यांच्या वडीलांविषयी गौरवोद्गार काढले. माने वकील अतिशय
विद्वान होते. त्यावेळी मी कोर्टात चपराशी म्हणून काम करत होतो. कोर्टात कोण कसे
वाद प्रतिवाद करतात हे बारकाईने बघायचो. माने वकील प्रतिवाद करु लागले की बाकीचे
वकील अस्वस्थ होत असे. धनंजय माने तोच वारसा पुढे घेऊन जात आहेत असेही शिंदे
म्हणाले. पुरस्कार निवड समितीने चांगल्या व्यक्तींची निवड केली आहे. ही मंडळी 'साधी राहणी, उच्च विचारसरणी' या
तत्वाची आहेत असेही शिंदे म्हणाले.