बजाजनगर दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपीचा एन्काऊंटर

औरंगाबाद: बजाजनगर येथील नामांकित उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी १५ मे रोजी झालेल्या दरोड्याप्रकरणी मुख्य आरोपी अमोल खोतकर (रा. पडेगाव) याचा सोमवारी (दि. २७) मध्यरात्रीनंतर पोलिसांनी एन्काऊंटर केला. गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, अमोल खोतकर हा वडगाव कोल्हाटी परिसरातील साई गार्डन लॉजिंग येथे येणार होता. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या पथकाने वडगाव – साजापूर रोडवर मध्यरात्री सापळा रचला होता. रात्री सुमारे ११.१५ वाजता पोलिसांना संशयित कार येताना दिसली. पोलिसांनी कार थांबवण्यासाठी इशारा दिला. मात्र, कारचालकाने थांबण्याऐवजी गाडी थेट पोलिसांच्या दिशेने चालवली. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार करत अमोल खोतकरला ठार केले, अशी माहिती पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी दिली. एन्काऊंटरची अधिकृत माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिली जाणार आहे, असेही त्यांनी नमूद केले. या दरोडा प्रकरणात इतर आरोपींचा शोध सुरु असून, पोलिस तपासात महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत.