आणीबाणी जाहीर: लॉस एंजेलिसमधील जंगलातील आग नियंत्रणाबाहेर

नवीदिल्ली : अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस परिसरात मंगळवारी (७ जानेवारी) आग लागल्याची घटना घडली आहे. जोरदार वाऱ्यांमुळे या आगीने रुद्ररूप धारण केले. ताशी 97 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आग वेगाने पसरली, ज्यामुळे 5 लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. या अपघातात एक हजाराहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली असून हजारो लोकांना सुरक्षित स्थळी जावे लागले आहे. या आगीनंतर आजूबाजूला धुराचे ढग दिसत आहेत. लॉस एंजेलिस परिसरातील आगीमुळे, अधिकाऱ्यांनी लाखो लोकांना शक्य तितक्या लवकर त्यांची घरे रिकामी करण्यास सांगितले आहे. मंगळवारी संध्याकाळी, लॉस एंजेलिसच्या ईशान्येकडील नैसर्गिक राखीव क्षेत्राजवळ लागलेल्या आगीने 2,000 एकरहून अधिक क्षेत्र व्यापले. ही आग नागरी भागापर्यंत पोहचली आहे.आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र आग विझवण्याऐवजी वेगाने पसरत आहे. जोरदार वाऱ्यामुळे आग आणखी भडकली आहे, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. बुधवारी (8 जानेवारी) वाऱ्याचा वेग ताशी 129 किलोमीटरवर पोहोचल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते. हॉलिवूड स्टार्सना घर सोडावे लागली आगीमुळे जेमी ली कर्टिस, मार्क हॅमिल, मँडी मूर आणि जेम्स वुड्स या हॉलिवूड स्टार्सना घर सोडावे लागले. अनेक घरांना आगीने वेढले आहे. घरातून निघताना अनेकांनी आपल्या गाड्याही रस्त्यांवरच सोडून दिल्या आहेत. यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या, अँबुलन्स, पोलिसांच्या गाड्यांना वाट करून देण्यासाठी बुलडोझरने या वाहनांना बाजुला केले जात आहे. अनेक घरांना वाचविण्यासाठी लोकांनी आजुबाजुची झुडुपे कापून टाकली आहेत.

प्रियांका चोप्राने व्यक्त केली चिंता! घरातून शेअर केला वणव्याचा व्हिडिओ बॉलिवूड स्टार प्रियांका चोप्रा लॉस एंजेलिसमध्ये राहाते. तिने येथील आगीच्या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. प्रियांकाने तिच्या घरातून वणव्याचा एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने येथे राहणाऱ्या लोकांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर पोस्ट केलेल्या क्लिपमध्ये काही अंतरावर वेगाने पसरणाऱ्या आगीच्या ज्वाळा दिसतात. "माझ्या संवेदना येथील प्रभावित सर्वांसोबत आहेत. आपण सर्वजण आज रात्री सुरक्षित राहू, अशी मला आशा आहे," अशी कॅप्शन तिने क्लिपला दिली आहे.