एलॉन मस्क यांचा ट्रम्प प्रशासनातून राजीनामा; सोशल मीडियावर केली घोषणा

वॉशिंग्टन अमेरिकन उद्योगपती आणि अब्जाधीश एलॉन मस्क यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमधील वरिष्ठ सल्लागार पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली. "सरकारी खर्च कमी करण्याची संधी दिल्याबद्दल मी ट्रम्प यांचे आभार मानतो," असे त्यांनी स्पष्ट केले. एलॉन मस्क हे ट्रम्प प्रशासनाच्या सरकारी कार्यक्षमता विभाग (DOGE) मध्ये विशेष कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी नमूद केले की, "या कार्यकाळात मला सरकारी वायफळ खर्च कमी करण्याची संधी मिळाली." तसेच, त्यांनी DOGE मिशन भविष्यात अधिक प्रभावशाली आणि लोकांच्या जीवनशैलीचा भाग बनेल, असा विश्वास व्यक्त केला. मस्क-ट्रम्प संबंधांमध्ये तणाव या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर मस्क यांनी ट्रम्प यांच्या ‘Big Beautiful Bill’ या विधेयकावर केली होती ती उघड टीका महत्त्वाची ठरते. त्यांनी सांगितले की, "हे विधेयक फक्त अतिशय खर्चिकच नाही तर DOGE च्या कार्यक्षमतेलाही बाधा पोहोचवते." या विधानामुळेच दोघांमधील तणाव वाढल्याचे म्हटले जात आहे. ट्रम्प यांनी आधीच दिला होता इशारा एप्रिलमध्ये ट्रम्प यांनीच सूचित केले होते की मस्क काही महिन्यांत DOGE सोडू शकतात. "एलॉन मस्क हुशार आहे. पण त्याच्याकडे खूप जबाबदाऱ्या आहेत. एक वेळ येईल जेव्हा तो पद सोडेल," असे ट्रम्प म्हणाले होते. मस्क यांच्या जाण्यानंतर DOGE विभागाची सूत्रे सचिवांकडे असतील, तर काही अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यकाळात केलेल्या योगदानासाठी एजन्सींमध्ये कायम ठेवण्याचा निर्णयही घेण्यात येणार आहे.