एक्स क्रिएटर्ससाठी मोठी बातमी; एलन मस्क यांचे पेआउट वाढवण्याचे संकेत
एलन मस्क यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) प्लॅटफॉर्मवरील कंटेंट क्रिएटर्ससाठी आनंदाची बातमी दिली आहे. क्रिएटर्सना दिल्या जाणाऱ्या पेआउटमध्ये वाढ करण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत त्यांनी सोशल मीडियावर दिले आहेत. सध्या युट्यूबच्या मॉनिटायझेशन मॉडेलशी स्पर्धा करण्यासाठी एक्स अधिक आक्रमक पावले उचलत असल्याचे चित्र आहे. एका एक्स युजरने क्रिएटर्सचे पेआउट वाढवण्याची मागणी करत एलन मस्क यांना टॅग केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना मस्क यांनी एक्सच्या प्रोडक्ट हेड निकिता यांना टॅग करत म्हटले, “ओके, चला करूया. मात्र यामध्ये नो-गेमिंग पॉलिसी सक्तीची असेल.” या उत्तरामुळे क्रिएटर्सच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यानंतर निकिता यांनीही लगेच उत्तर देत सांगितले की, या दिशेने काम सुरू आहे. त्यांनी स्पष्ट केले की, नवीन पेआउट मेथडमुळे जवळपास ९९ टक्के फ्रॉड थांबवता येईल. सध्याच्या एन्गेजमेंट-आधारित पेआउटमध्ये होणाऱ्या छेडछाडीवर त्यांनी यावेळी भाष्य केले. एलन मस्क यांनी अलीकडे अनेक क्रिएटर्सच्या पोस्टवर उत्साहाने प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये स्वतंत्र पत्रकार निक शेर्ली यांचा देखील समावेश होता. शेर्ली यांनी मिनेसोटामधील डे-केअर फ्रॉड प्रकरण उघडकीस आणले होते. दरम्यान, एक्स प्लॅटफॉर्म सध्या युट्यूबच्या अॅडसेन्स मॉडेलच्या तुलनेत मागे असल्याचे मत अनेक क्रिएटर्स व्यक्त करत आहेत. निक शेर्ली यांनी म्हटले होते की, एक्सवर पोस्ट करण्यासाठी त्यांनी मित्रांना प्रोत्साहित केले, मात्र आर्थिकदृष्ट्या इतर प्लॅटफॉर्म अधिक फायदेशीर असल्याने अनेकांनी ते टाळले. काही युजर्सच्या मते, जर एक्सने युट्यूबपेक्षा अधिक पैसे देण्यास सुरुवात केली, तर ते खरे ‘गेम चेंजर’ ठरू शकते. यामुळे अधिक विश्वासार्ह आणि दर्जेदार कंटेंट एक्सकडे आकर्षित होईल. सध्याच्या घडीला लार्ज लँग्वेज मॉडेल्ससह अनेक एआय प्रणाली ऑनलाइन कंटेंटवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. याआधीही एलन मस्क यांनी एक्सने क्रिएटर कॉम्पेन्सेशनच्या बाबतीत युट्यूबपेक्षा पुढे गेले पाहिजे, असे वक्तव्य केले होते. ऑक्टोबरमध्ये त्यांनी मान्य केले होते की, एक्स सध्या क्रिएटर्सना कमी पैसे देत आहे आणि उत्पन्नाचा वाटा अचूकपणे वितरित होत नाही. त्याच वेळी त्यांनी युट्यूब हे मॉडेल चांगल्या पद्धतीने राबवत असल्याचेही कबूल केले होते. एक्स क्रिएटर्स मॉनिटायझेशन प्रोग्राम हा मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर सुरू करण्यात आला होता. सध्या या अंतर्गत केवळ पात्र आणि व्हेरिफाईड युजर्सनाच एन्गेजमेंटच्या आधारावर अॅड रेव्हेन्यू शेअर दिला जात आहे.