राज्यातील वीजदर कमी होणार; अर्थमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा

मुंबई : राज्याच्या 2025-26 च्या अर्थसंकल्पाची आज सोमवारी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादरीकरण केले. नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून, अर्थमंत्री म्हणून अजित पवारांचा हा 11वा अर्थसंकल्प आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी यासारख्या योजनांची घोषणा होण्याकडे जनतेचे लक्ष लागले असताना, अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना आणि उद्योगांना मोठा दिलासा देणारी वीजदर कपातीची घोषणा केली.

पाच वर्षांत वीजदर कमी होणार

अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार म्हणाले, “महावितरण कंपनीने येत्या 5 वर्षांसाठी वीज दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे.” तसेच, ऊर्जा क्षेत्रातील नियोजन आणि कमी दराने हरित ऊर्जा खरेदी केल्यामुळे वीज खरेदी खर्चात 1.13 लाख कोटी रुपयांची बचत होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

औद्योगिक वीजदर इतर राज्यांपेक्षा कमी होणार

राज्यातील उद्योगांना स्वस्त वीज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. या धोरणामुळे महाराष्ट्रातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत स्वस्त होतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

राज्याच्या शाश्वत विकासावर भर

अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही.” तसेच, राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ताराराणी, अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करत, हे वर्ष ऐतिहासिक असल्याचे सांगितले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, नोव्हेंबर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने सरकारवर विश्वास दाखवला असून, महायुती सरकार राज्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार आहे.