एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; माढा-सोलापूर शिवसेना कार्यकारिणी बरखास्त

एकनाथ शिंदे : राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून, शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. या निर्णयामध्ये शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच इतर अंगीकृत संघटनांचे जिल्हाप्रमुख ते शाखाप्रमुख स्तरावरील सर्व पदाधिकारी समाविष्ट आहेत. पक्ष संघटनात्मक बदलांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आगामी काळात संघटनेला नव्याने बळकटी देण्यासाठी ही मोठी पायरी मानली जात आहे.

नवीन नियुक्त्या लवकरच
लवकरच विभागीय संपर्कप्रमुख, सहसंपर्कप्रमुख आणि लोकसभा संपर्कप्रमुख यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात येणार आहेत. या प्रक्रियेनंतर शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. संपर्कप्रमुखांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंतिम निर्णय पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार घेतला जाणार आहे. या निर्णयामुळे माढा आणि सोलापूरमधील शिवसेना संघटनात्मक समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.