शिक्षण क्षेत्र आरएसएसच्या हाती; राहुल गांधींचा आरोप

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठा मुद्दा रोजगाराचा आहे आणि सरकार या मुद्द्यावर गप्प आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्या हिताशी तडजोड करणार नाही. आरएसएस देशाची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करत आहे आणि भविष्यात कोणालाही रोजगार मिळणार नाही, असा गंभीर आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला. देशभरातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया अलायन्सच्या विद्यार्थी संघटनांनी सोमवारी दिल्लीतील जंतरमंतरवर निदर्शने केली. विद्यार्थी संघटना राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी), नियुक्त्यांबाबत यूजीसीच्या प्रस्तावित मार्गदर्शक तत्त्वे मागे घेण्याची आणि विद्यार्थी संघटनांची पुनर्स्थापना करण्याची मागणी करत आहेत. यावेळी राहुल गांधी म्हणाले, "विद्यार्थ्यांना हे सांगण्याची जबाबदारी तुमची आहे की विद्यापीठाचे कुलगुरू हे आरएसएसचे आहेत. येणाऱ्या काळात, सर्व विद्यापीठांचे कुलगुरू आरएसएसच्या नामांकनातून नियुक्त केले जातील. हे देशासाठी धोकादायक आहे. आपल्याला हे थांबवावे लागेल." ते पुढे म्हणाले, "देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक विद्यापीठात असेच निषेध करा. तुम्हाला जिथे मला घेऊन जायचे असेल तिथे मी तुमच्यासोबत जाईन. तुम्ही विद्यार्थी आहात. येथे वेगवेगळे पक्ष आहेत, विचारसरणीत थोडा फरक असू शकतो, पण आम्ही भारताच्या शिक्षण व्यवस्थेशी कधीही तडजोड करणार नाही." पंतप्रधानांनी कुंभमेळ्यावर भाषण दिले. यावर बोलणे चांगले आहे, परंतु तुम्ही भविष्याबद्दलही बोलले पाहिजे, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.