नवी दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये घबराट

नवी दिल्ली: राजधानी नवी दिल्ली सह नोएडा आणि गाझियाबाद परिसर आज सोमवार सकाळी भूकंपाने हादरले. लोक पहाटे उठण्याच्या तयारीत असताना जमीनच हादरून गेल्याने सर्वत्र घबराट पसरली.

पिटीआय या वृत्तसंस्थेने याबाबत तपशीलवार माहिती दिली आहे.

सोमवारी सकाळी 5:36 मिनिटांनी राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4 मोजण्यात आली.

भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमधील लोक घाबरून घराबाहेर पडले. मात्र, अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त मिळालेले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूकंपाच्या संदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ट्विट केले. त्यांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती दिली.

नोएडा सेक्टर 20 येथील ई ब्लॉकमध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका महिलेने सांगितले की, "आम्ही पार्कमध्ये फिरत होतो, त्यामुळे आम्हाला फारसे काही वाटले नाही. पण झटके खूप मोठे होते, लोक लगेच बाहेर आले."

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रयागराजला जाण्यासाठी ट्रेनची वाट पाहत असलेले रतनलाल शर्मा म्हणाले की, एखादी ट्रेन अचानक धक्का देऊन थांबल्यासारखे वाटले.

एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, त्याचे केंद्र धौला कुआन येथील दुर्गाबाई देशमुख कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशनजवळ आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या प्रदेशात दर दोन ते तीन वर्षांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवतात. यापूर्वी 2015 मध्ये येथे 3.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. भूकंपासह मोठा आवाजही ऐकू आला, ज्यामुळे अनेक लोक घाबरले.