दिल्ली-एनसीआरमध्ये सकाळी भूकंपाचे धक्के, हरियाणातील रोहतक केंद्रबिंदू

नवी दिल्ली : दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर)मध्ये आज सकाळी ९.०४ वाजता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.
रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.१ इतकी नोंदवण्यात आली असून, केंद्रबिंदू हरियाणातील रोहतक येथे होता. भूकंपाचा फटका उत्तर भारतातील अनेक भागांना बसला असून, जिंद, बहादूरगड, पश्चिम उत्तर प्रदेश, तसेच राजस्थानच्या काही भागांतही धक्के
जाणवले. अचानक आलेल्या या हादऱ्यांमुळे इमारती हलल्याने घाबरलेल्या नागरिकांनी
घराबाहेर धाव घेऊन मोकळ्या जागेत आसरा घेतला. सुदैवाने या भूकंपामुळे अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तब्बल १० सेकंद या धक्क्यांची तीव्रता जाणवत होती. तीन महिन्यांपूर्वीही आला होता भूकंप यापूर्वी, १९ एप्रिल रोजी दुपारी १२:१७ वाजता, अफगाणिस्तानमध्ये 5.8 रिश्टर तीव्रतेचा
भूकंप झाला होता. त्याचे हादरे
जम्मू-काश्मीरपासून दिल्ली-एनसीआरपर्यंत जाणवले होते. त्या वेळीही कोणतीही हानी
झालेली नव्हती. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क
असून नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.